जळगाव : जळगाव शहरातील तुकाराम वाडी येथील एका ६० वर्षे वृद्ध व्यक्तीचा उन्हाच्या फटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता समोर आले आहे. एसटी वर्कशॉप जवळील भिंतीजवळ त्यांचा मृतदेह आढळल्याने मोठे खळबळ उडाली आहे.
लोधू नामदेव पाटील (वय ६०, रा.हिंगणे ता.बोदवड ह. मु. तुकाराम लवाडी, नेरीनाका ,जळगाव) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
लोधू पाटील हे आपल्या पत्नीसह तुकारामवाडी परिसरामध्ये वास्तव्याला होते. एमआयडीसीतील दालमिल कंपनीमध्ये ते कामाला होते. दरम्यान शनिवारी २५ एप्रिल रोजी त्यांच्या मूळगावी त्यांच्या पत्नीचे लग्न असल्या कारणामुळे ते पत्नीसह हिंगणे गावात गेलेले होते. रविवारी संध्याकाळी लग्न आटोपल्यानंतर ते सायंकाळी सात वाजता जळगाव येथे बसने आले. दरम्यान रात्रीपर्यंत ते घरी न पोचल्यामुळे त्यांच्या नातेवाईकाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु आज सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता सुमारास निरी नाका जवळील एसटी वर्कशॉप जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान एमआयडीसी जाणाऱ्या काही कामगारांनी त्यांची ओळख पटविली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला होता.
जळगाव जिल्ह्यात काल 44 हून अधिकचे तापमान असल्या कारणामुळे त्यांना उन्हाचा फटका बसला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे दरम्यान शवाविच्छेदनानंतरच याची माहिती समोर येईल असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
जळगावकरांना उन्हाच्या तीव्र झळा आता असह्य होऊ लागल्या आहेत. सोमवारी जळगावच्या तापमानाने नवा उच्चांक गाठला असून, कमाल तापमानाची नोंद ४४.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
एम. ओ. ओर्स (M. O. Ors) जळगाव केंद्राने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, आजचे कमाल तापमान ४४.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस इतके राहिले. विशेष म्हणजे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण (RH) ५८ टक्के इतके जास्त असल्याने नुसते ऊनच नाही, तर घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.