जळगाव : येथील सर्वात महत्त्वाचे धरण असलेले हतनुर धरणाचे आज सोमवार (दि.२९) रोजी बारा दरवाजे पूर्णपणे सकाळी दहा वाजता उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात दमदार पाऊस झाल्यामुळे रविवार (दि.२८) रोजी रात्री बारा वाजेपासून एक मीटरने गेट उघडण्यात आले होते ते सोमवार (दि.२९) रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण हे महत्त्वाचे धरण असून या धरणावर वीज निर्मिती सिंचन रेल्वे तसेच नगरपालिका पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा या महत्त्वाच्या हतनूर धरणात असलेल्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात २४ तासात पाऊस झालेला आहे. यामध्ये बऱ्हाणपूर, डेड, तलाई, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहटार व अकोला हे हतनूर धरणाची पाणलोट क्षेत्र असून या ठिकाणी झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्णपणे सकाळी दहा वाजेला उघडण्यात आलेले होते
रविवार (दि.२८) रोजी रात्री बारा वाजेला हतनुर धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. मात्र सोमवार (दि.२९) रोजी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक मीटरनेच उघडलेले होते. त्यानंतर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सकाळी सात वाजता आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले तर दहा वाजता बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात येऊन धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
सोमवार (दि.२९) रोजी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापन केंद्रावर, मागील २४ तासात झालेला पाऊस (मि. मी.) असा..
बऱ्हाणपूर - १८.६
देढतलाई - २२.४
टेक्सा - ६५.४
एरडी - १७.८
गोपालखेडा - १३.६
चिखलदरा - ६९.८
लखपुरी - ११.२
लोहारा - ७.२
अकोला - २२.८
एकूण - २४८.८ मि. मी.
सरासरी - २७.६ मि. मी.
हतनूरमध्ये रविवार (दि.२८) रोजी रात्री बारा वाजता पाणी पातळी - २१०.५०० मी. झालेली असताना एकूण पाणी साठा २१४.०० दलघमी. तर एकुण पाणी साठा टक्केवारी ५५.१५ टक्के नोंदविण्यात आली. यावेळी धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. तर ४३२ क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आले होते. तर सोमवार (दि.२९) रोजी सकाळी सात वाजता २१०.७४० मी. इतका पाणीसाठा जमा होत तो ५७.६३ टक्के नोंदविण्यात आला असून यावेळी धरणाचे आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी ८ वाजता २२६ दलघमी पाणीसाठा होऊन ५८.२५ टक्के नोंदविण्यात आला. तर अवघ्या दोन तासाने म्हणजेच दहा वाजता पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने २३०.५० दलघमी पाणीसाठा झाल्याने ४१ पैकी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे तर १८२२ क्सुसेकने विसर्ग सुरु आहे.
हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
सोमवार (दि.२९) रोजी सकाळी अकरा वाजता पाणी साठ्यात २३६.५० दलघमी. वाढ झाल्याने एकूण पाणीसाठा ६०.९५ टक्के आहे. तर २२३९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आता हतनूरचे १४ दरवाजे पूर्ण पर्ण उघडण्यात आलेले आहेत.