जळगाव : चाळीसगाव ते कन्नड घाटदरम्यान कुप्रसिद्ध ‘हाफ चड्डी गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाचोरा येथील एका डॉक्टरांच्या कुटुंबाला लक्ष्य करत सात ते आठ चोरट्यांनी अवघ्या २० ते ३० मिनिटांत तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोरा येथील रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. योगेश नेताजी पाटील यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचारासाठी पुण्याकडे रवाना झाले होते. शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ते पत्नी नूतन पाटील, भाऊ दिनेश पाटील, दाजी भरत पाटील आणि चालक भूषण पाटील यांच्यासह बेलेनो (MH 19 CB 6486) या कारने निघाले.
शनिवारी पहाटे ४.१५ ते ४.२० च्या सुमारास चाळीसगाव-कन्नड घाटातील रांजणगाव फाटा, नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या गाडीला खालून काहीतरी अवजड वस्तू लागल्याने इंजिनमधून धूर येऊ लागला. गाडी थांबवून त्यांनी तपासणी सुरू केली असता, अचानक सात ते आठ मुखवटाधारी चोरटे त्यांच्या दिशेने धावत येताना दिसले.
चोरट्यांनी कुटुंबाला धमकावून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने घेतला. यावेळी त्यांनी चालकाचा मोबाईलही तोडून टाकला. “गाडीत बसा आणि निघा,” अशी धमकी देत हे चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या चोरट्यांपैकी बहुतांश जणांनी काळ्या रंगाचे शर्ट, हाफ पँट आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचे रुमाल बांधले होते, तर एकाने पांढरा शर्ट परिधान केला होता. त्यांचे वय अंदाजे २० ते ३५ वर्षांदरम्यान असल्याचे समजते. या विशिष्ट वेषामुळेच त्यांना पुन्हा ‘हाफ चड्डी गँग’ म्हणून ओळखले जात आहे.
दरम्यान, रेणापूर (जि. लातूर) येथील सुरेश गोविंदा नागरगोजे हे चार-पाच सहकाऱ्यांसह स्विफ्ट डिझायर कारने उज्जैनकडे जात होते. पहाटे सुमारे ४ वाजता कन्नड घाटाच्या खालील बाजूस त्यांच्या गाडीखालीही काहीतरी लागले. खाली उतरल्यावर त्यांना लोखंडी जॅक दिसला. तत्परतेने त्यांनी पुन्हा गाडीत बसून तेथून निघून गेल्याने त्यांची लूट टळली. पोलिसांना संशय आहे की, हीच टोळी डॉक्टर पाटील यांच्या लुटीला जबाबदार असावी.
घटनेनंतर पीडित कुटुंबाने ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. योगेश पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘हाफ चड्डी गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून, या टोळीचा माग काढून त्यांना जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.