Opposition Criticism Gulabrao Patil
जळगाव : मंत्रालयातील बैठकीत लोकप्रतिनिधींना देण्यात आलेल्या काजू-बदामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. बैठकीत जे पदार्थ उपलब्ध होते, ते खाल्ले. समोसा असता तर तोही खाल्ला असता. मात्र, शेतकऱ्यांचा घास हिरावणारे आम्ही नाही, तर त्यांच्या मुखात घास देण्यासाठी काम करणारे आहोत, असे पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या १२ नवीन वाहनांचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
काजू-बदामाच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन ते चार तास चालणाऱ्या बैठकीत भूक लागणे स्वाभाविक आहे. गेल्या २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असून, शासकीय शिष्टाचारानुसार टेबलावर जे दिले जाते, तेच आमदारांनी खाल्ले. यात कोणताही वेगळा हेतू नव्हता. या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. शेतकरी आमच्यासाठी देवतासमान आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, आमच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा काळ विरोधी बाकांवर बसून सरकारविरोधात संघर्ष करण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख आम्हाला शिकवण्याची गरज नाही. पूर्वी दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा असताना सरकारने तीन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना दोन ते तीन पट वाढीव मदत मिळवून दिली असल्याचा दावाही त्यांनी केला.
२०१९ पासून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांपर्यंत योग्य मदत पोहोचविण्यासाठी पंचनामे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दररोज परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.