जळगाव : जळगाव तालुक्यातील धानवड गावात सोमवारी (दि.31) रात्री वीज कोसळून 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे 55 वर्षीय आजोबा गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
वीज कोसळल्याने या दुर्देवी घटनेत अंकुश विलास राठोड (वय 15, रा. धानवड, ता. जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय 55) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अंकुश राठोड हा कुटुंबासोबत धानवड गावात राहत होता. त्यांचे शेत धानवड धरणाजवळ असून, तो रोज आजोबा शिवाजी राठोड यांच्यासोबत शेतात राखण करण्यासाठी जात असे. सोमवारी (दि.31) रात्री 8.30 च्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि दोघांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये अंकुशचा जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी राठोड गंभीर जखमी झाले आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अंकुशला मृत घोषित केले, तर जखमी शिवाजी राठोड यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.