सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. Pudhari News Network
जळगाव

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य "जय शिवराय, जय भारत" पदयात्रा

विद्यार्थी, स्वयंसेवक अनेकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय "जय शिवराय, जय भारत" पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

"जय शिवराय, जय भारत" पदयात्रेत सहभागी खासदार स्मिता वाघ

शुभारंभ आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधवार (दि.19) रोजी सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, सचिव राम पवार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जय शिवराय, जय भारत" पदयात्रेत बालकलाकारांनी शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर केले

संविधान उद्देशिका वाचनांनतर पदयात्रेची सुरुवात

खासदार स्मिता वाघ यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. त्यानंतर जळगावच्या प्रसिद्ध शाहीर श्री ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यगीत सादर केले. यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून पदयात्रेला सुरुवात झाली.

या पदयात्रेतील आकर्षण असे...

  • शिवरायांचा रथ – पदयात्रेत आकर्षक सजविलेल्या रथावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान केलेले बालकलाकार होते.

  • मर्दानी खेळ – युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

  • योग प्रात्यक्षिके – अनिता पाटील आणि चंचल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिड आणि विविध योगासने सादर केली.

  • आदिवासी नृत्य – आदिवासी विकास विभागाच्या वतीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लेझीम पथक, ढोल ताशा पथक यांनी उपस्थितांची मने जिंकली.

सामाजिक उपक्रम आणि समारोप

पदयात्रेदरम्यान पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पदयात्रा चित्रा टॉकीज मार्गे शिवतीर्थावर पोहोचली, जिथे शिवरायांची आरती करून समारोप करण्यात आला.

उत्साहपूर्ण वातावरण आणि व्यवस्थापन

यावेळी सहभागी नागरिकांसाठी दूध, पाणी, केळी आणि बिस्किटे याप्रमाणे नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली.

ही पदयात्रा जळगावकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली, ज्यामध्ये इतिहास, परंपरा आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम पहायला मिळाला. भव्य "जय शिवराय, जय भारत" पदयात्रेत

या शाळांनी सहभाग नोंदवला

सौ. प. न. लुंकड कन्याशाळा, कै. श्रीम. ब. गो. शानबाग माध्यमिक विद्यालय, सावखेडे, न. वा. मु. विद्यालये, मुळजी जेठा महाविद्यालय, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, उज्वल स्कूल,सेंट टेरेसा स्कूल, शेठ ला. ना. सा. विद्यालय, नूतन मराठा विद्यालय, भाऊसाहेब राऊत विद्यालय, सेंट लॉरेन्स हायस्कूल,आर. आर. विद्यालय,श्रीमती जे. ए. बाहेती हायस्कूल याशिवाय जळगाव शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथक, ढोल पथक, एनसीसी कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पदयात्रेचा उत्साह द्विगुणित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT