Goods Train Accident Surat Bhusawal Route
जळगाव: भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरली. ही घटना गुरूवारी (दि. १५) दुपारी २ वाजता घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली. रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅकही खराब झाले आहेत. यामुळे सुरत-भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
अमळनेर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मालगाडी नेमकी कोणत्या कारणामुळे रुळावरून घसरली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.