Gold Silver Rates Jalgaon
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. जळगाव आणि सावदा येथील प्रसिद्ध 'भांगळे गोल्ड'ने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार, ३ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा दोन हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात झालेल्या या दरकपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा एक लाख ४० हजार रुपये होता. त्यात दोन हजार रुपयांची घट होऊन ३ नोव्हेंबर रोजी हा दर एक लाख ३८ हजार रुपयांवर आला. २२ कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचा दरही एक लाख २८ हजार २४० रुपयांवरून एक लाख २६ हजार ४०० रुपयांवर घसरला. त्यामुळे या प्रकारच्या सोन्यात प्रति तोळा एक हजार ८४० रुपयांची कपात झाली आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी प्रति किलो एक लाख ८६ हजार रुपये असलेली चांदी ३ नोव्हेंबर रोजी एक लाख ८० हजार रुपयांवर आली. एकाच दिवसात किलोमागे सहा हजार रुपयांची घट झाल्याने चांदी खरेदीदारांनाही दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या दरातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली नफावसुली यांचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावर होत आहे. गेल्या काही दिवसांतील दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, एकाच दिवसात झालेल्या मोठ्या दरकपातीमुळे जळगाव आणि परिसरातील सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारातील घडामोडींनुसार दिवसभरात दरांमध्ये आणखी बदल होऊ शकतात, असे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.