Girna Dam Water Level Pudhari
जळगाव

Girna Dam | जळगावातील आठ तालुक्यांची पाणीचिंता मिटली; दहा दिवसांत गिरणा धरणात ४६ टक्के पाणीसाठा वाढला

पाणीसाठा ८६.२९ टक्क्यांवर पोहोचला, संभाव्य पाणीटंचाई आणि पाणीकपातीचे संकट टळले

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Talukas Water Relief

जळगाव : नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या दहा दिवसांत विक्रमी वाढ झाली आहे. १८ जुलै रोजी केवळ ४०.२७ टक्के असलेला धरणातील साठा २७ जुलैपर्यंत थेट ८६.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अवघ्या दहा दिवसांत तब्बल ४६ टक्क्यांची झालेली वाढ जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा ठरली असून, आठ तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.

गिरणा धरणावर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव या आठ तालुक्यांतील प्रमुख नगरपालिका, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. धरणातील साठा ८६ टक्क्यांहून अधिक झाल्याने संभाव्य पाणीटंचाई आणि पाणीकपातीचे संकट सध्या तरी टळल्याचे चित्र आहे.

गिरणा धरणावर मोठे सिंचन क्षेत्रही अवलंबून असल्याने जुलैच्या मध्यापर्यंत कमी साठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातून आलेल्या मोठ्या आवकेमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. परिणामी आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

धरण प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १८ जुलै रोजी धरणाची पाण्याची पातळी ३९०.५४९ मीटर होती. त्यावेळी जिवंत साठा २१०.८४१ घनमीटर असून साठवण क्षमता ४०.२७ टक्के होती. २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याची पातळी ३९६.७५८ मीटरवर पोहोचली असून जिवंत साठा ४५१.७५३ घनमीटर आणि एकूण साठवण ८६.२९ टक्क्यांवर नोंदविण्यात आली. मागील तीन तासांत १४७ एमसीएफटी (४.१६० दशलक्ष घनमीटर) पाण्याची आवक झाली आहे.

सध्या धरणाचे सर्व रेडियल गेट्स बंद असून सांडव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. सिंचन आउटलेट आणि पीएलबीसी कालव्यामधूनही पाणी सोडण्यात आलेले नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास गिरणा धरण लवकरच शंभर टक्के क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT