गिरीश महाजन- गुलाबराव पाटील Pudhari photo
जळगाव

Girish Mahajan - Gulabrao Patil : ‘पगार मी वाढवला अन् टाळ्या मंगेशदादांना!’; गिरीश महाजन-गुलाबराव पाटलांची जुगलबंदी

पोलीस पाटील मेळाव्यात रंगली मिश्किल चढाओढ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगावात आयोजित पोलीस पाटील मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मिश्किल जुगलबंदी रंगली. एकमेकांच्या वयावरून टोलेबाजी करतानाच दोन्ही नेत्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांनी मिश्किल शेरेबाजी केली.

गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याकडे पाहत, ‘मी लहान आहे, गिरीशभाऊ ज्येष्ठ आणि वयोवृद्ध आहेत,’ असा चिमटा काढला. त्यावर महाजन यांनी, ‘गुलाबभाऊ, तरुण दिसण्याचा कितीही आव आणला तरी ते तुम्हाला जमणार नाही. पोलीस पाटलांनाच विचारा, कोण म्हातारं दिसतंय,’ असा प्रतिटोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

‘मी उपमुख्यमंत्र्यांचा, महाजन मुख्यमंत्र्यांचे’

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा मुद्दा उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून मिश्किल टोला लगावला. ‘आम्ही तुमची फाईल फिरवतो की तुम्ही आमची, हे आज कळले. मानधन वाढवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते गिरीश महाजन शेजारीच बसले आहेत. मी तर उपमुख्यमंत्र्यांचा माणूस आहे,’ असे ते म्हणाले.

गावांमध्ये दारू आणि अमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गावाच्या संरक्षणासाठी पोलीस पाटलांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महिला पोलीस पाटलांनी स्वतःला कमजोर समजू नये, त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पगार मी वाढवला, टाळ्या मंगेशदादांना’

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. ‘मंगेश चव्हाण यांचा कामाचा फॉलोअप वाखाणण्याजोगा आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री असताना पगार मी वाढवला आणि टाळ्या तुम्ही मंगेशदादांसाठी वाजवत आहात,’ असा टोला महाजन यांनी लगावला. गावांमध्ये १२-१३ वर्षांच्या मुलांकडून आयोडेक्स, बाम आणि विक्ससारख्या वस्तूंचा नशेसाठी वापर होत असल्याच्या प्रकारांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांनी व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे पाटलांच्या मागण्यांवर महाजनांची टीका

मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली. ‘सरकारने १४ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. प्रत्येक वेळी उपोषणाला बसल्यानंतर सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या मागण्या असंविधानिक असतील तर त्या कशा मान्य करायच्या? मागण्यांना कुठेतरी मर्यादा हवी. उच्चपदस्थ मंत्र्यांना शिवीगाळ करून मार्ग निघणार नाही,’ असे महाजन म्हणाले.

एमपीएससी पेपरफुटीवर विरोधकांवर निशाणा

एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावरही महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. पेपरफुटीच्या प्रकरणात काही लोकांचा पैशाच्या हव्यासापोटी नालायकपणा समोर आल्याचे ते म्हणाले. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी, ‘संजय राऊत मनात येईल ते बरळतात. स्वतःला मारण्याचा कट रचल्याचा कांगावा ते करतात; मात्र ते अजून सुखरूप आहेत,’ असा टोला लगावला.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे समर्थन

पुण्यातील बनावट खवा-पनीर प्रकरणातील अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचेही महाजन यांनी समर्थन केले. तुकाराम मुंढे यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत, मोठ्या प्रमाणावर बनावट खवा-पनीर पकडले जाणे ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण मोकळीक दिल्याचेही महाजन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT