जळगाव : राज्यातील सर्वात महत्त्वाचे केंद्र ठरलेले नाशिक सध्या पालकमंत्री पदाच्या वादामुळे चर्चेत आहे. अद्याप या पदावर अंतिम निर्णय झालेला नसल्यामुळे तिढा कायम आहे.
या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारले असता, त्यांनी "ते आधीच त्रस्त आहेत, हा विषय जाऊ द्या," असे म्हणत त्या विषयाला बगल दिली आणि प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहे. मात्र, नाशिकच्या पालकमंत्र्यांची घोषणा होताच वाद उफाळून आला. त्यामुळे या वादाला स्थगिती देत मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री या नात्योन नाशिकचे पालकत्व आपल्या ताब्यात घेतले.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे या दोन्ही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या नेत्यांचे पक्षही वेगळे असून दोघेही प्रभावशाली आहेत. त्यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या मुद्यावर प्रतिक्रिया देण्याचे गिरीश महाजन यांनी टाळल्याने चर्चा पुन्हा रंगली आहे.