जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त एक रूपयात होत असते. तरीही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत, त्यामुळे फसवणूकीचे प्रकार होणार नाहीत. (bandhkam kamgar taluka suvidha kendra)
महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांसाठी तालुका कामगार सुविधा केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये नवीन नोंदणी किंवा नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी अर्ज सादर करता येतात. यासाठी, संबंधित कामगारांना आपल्या मूळ कागदपत्रांसोबत तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे लागते
प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात 15 ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहेत. यामुळे कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे. या सुविधेमुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार आहे.
तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की, अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.
ही सर्व नोंदणी प्रकिया मोफत असून एजंट व त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन अवघ्या एक रूपया नोंदणी फी भरुन नोंदणी करावी. एजंटने पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.डॉ. रा. दे. गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त , जळगाव