जळगाव : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या असून, पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध घेण्यात यश आलेले नाही.
जळगाव तालुक्यातील खेडी गावातून 14 आणि 15 वर्षे वयोगटातील दोन सख्या बहिणी किराणा दुकानावर गेल्या असताना अज्ञात इसमाने त्यांना फूस लावून पळवले. याबाबत जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा येथील फरजान तांबोळी ही एका ओळखीच्या महिलेसोबत डी मार्ट येथे गेली होती. घरी परतल्यानंतर तिच्या 15 वर्षीय मुलीला फोन केला असता, तिचा फोन बंद आढळला. त्यानंतर शोधाशोध करूनही मुलगी मिळून आली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील बाळद गावातून 16 वर्षे वयोगटाच्या मुलीला आमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेले. याबाबत फिर्यादी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. मोटारसायकल चोरीच्या घटनांसह, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने या घटनांची दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.