जळगाव : तालुक्यातील कंडारी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकिला कंटाळून आपल्या राहत्या घरात पिकांवरील फवारणीचे औषध पिऊन जीवन संपवले. शेतकऱ्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान एकनाथ धनगर वय ४० रा. कंडारी ता. जळगाव हा आपल्या परिवारासह गावात राहत होता. शेतीच्या कामावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही वर्षापासून शेतात झालेल्या नापिकी व कर्जबाजारी मुळे समाधान धनगर चिंतेत होता. रविवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्याने पिकांवर फावरणीसाठी लागणारे विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना दि. 25 च्या रात्री नऊ वाजेला त्याचा मृत्यू झाला. जळगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी रेखाबाई, मुलं भैय्या आणि गोलू असा परिवार आहे.