Jeweller robbery  Pudhari File Photo
जळगाव

Jalgaon Robbery | ‘मी पोलीस आहे’ म्हणत महिलेची लूट; बनावट पोलिसांनी अडीच लाखांचे दागिने पळवले!

एरंडोलजवळ भरदिवसा तिघा भामट्यांचा कारनामा; बनावट ओळखपत्र दाखवून महिलेची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Erandol Fake Police Rob Woman

जळगाव : ‘मी पोलीस आहे, पुढे साहेबांची गाडी उभी असून तपासणी सुरू आहे,’ अशी बतावणी करत दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी एका ५८ वर्षीय महिलेची फसवणूक करून तब्बल २ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. एरंडोल तालुक्यातील म्हसावद-एरंडोल रस्त्यावर वरखेडी फाट्यापुढील नाथबाबा मंदिराजवळ ३० ऑक्टोबर रोजी भरदिवसा हा प्रकार घडला. याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील विद्या भरत पाटील (वय ५८) या ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास म्हसावद-एरंडोल रस्त्याने जात होत्या. वरखेडी फाट्यापुढील नाथबाबा मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यापैकी एकाने बनावट ओळखपत्र दाखवत आपण पोलीस असल्याचे सांगितले. तसेच पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांची गाडी उभी असून तपासणी सुरू असल्याचे सांगून त्यांना घाबरवले.

पोलिसांकडून तपासणी होत असल्याच्या बतावणीवर विश्वास ठेवून विद्या पाटील यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून आरोपींनी दिलेल्या कागदात ठेवले. याचवेळी आरोपींनी त्यांच्यासोबत असलेले भाऊ भरत किसन पाटील यांना नाव विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवले. या संधीचा फायदा घेत तिघांनी दागिन्यांची पुडी हातोहात लंपास केली आणि दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.

अडीच लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी लांबवलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ९९ हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व दोन ग्रॅमचे पेंडल आणि ९ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचे दागिने आरोपींनी लंपास केले.

तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

विद्या पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करीत आहेत.

दरम्यान, बनावट पोलीस असल्याचे भासवून भरदिवसा महिलांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT