जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती येऊ लागली आहे. अर्ज प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि भाजपकडून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.
प्रभाग १२ ‘अ’ मधून अनिल अडकमोल यांचा अर्ज दाखल
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधून अनिल अडकमोल यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. अडकमोल यांनी भाजपकडून एक आणि अपक्ष म्हणून दोन असे एकूण तीन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. आरपीआय (आठवले गट) आणि भाजपच्या वतीने दाखल झालेला हा पहिलाच अधिकृत अर्ज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही
पहिला अर्ज दाखल झाला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा पेच कायम आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून प्रत्येक घटक पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी २० ते २५ जागांची मागणी करत आहे. सन्मानजनक जागा वाटप झाल्यासच एकत्र निवडणूक लढवण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतल्याने अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अर्ज विक्रीत लक्षणीय वाढ
निवडणुकीसाठी जळगावच्या १९ प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवरून सुमारे २८० उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. हा आकडा पाहता येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.