जळगाव : जिल्ह्यातील साधारण 170 पतसंस्थांमध्ये मागील दहा वर्षांपासून अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी वृद्ध ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 2007 पासून सात ते आठ हजार वृद्ध ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, अद्याप परतावा मिळालेला नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी ठेवीदारांनी विविध घोषणा देत तीव्र आंदोलन केले.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पाठवण्यात आलेल्या महिला ठेवीदारांच्या प्रस्ताव मंजूर करण्याबाबत अर्जावर कारवाई न करणाऱ्यां विरुद्ध कारवाई करण्याबाबत अशा मागण्यांसह महिला ठेवीदारांनी पाल्यांच्या शिक्षण आणि विवाहासाठी शासनाने दिलेल्या मंजूर सहकारी सोसायटीमध्ये पैसे ठेवलेले होते. मात्र अद्यापही ते ठेवी मिळाले नाहीत. राज्य महिला आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारी व त्यांनी दिलेल्या आदेशावर सुद्धा कारवाई आवश्यक असताना अद्यापपर्यंत काहीही करण्यात आलेले नाही. अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. जिल्ह्यातील पतसंस्था संचालकांविरुद्ध एम पी आय टी ऍक्ट 1999 संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याबाबत संदर्भात शासनाकडे जिल्हाधिकारी व एसपी यांचा संयुक्त अहवाल गेला पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या ठेवी लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.