theft Pudhari
जळगाव

खाकी सुस्तावली अन् चोरटे सुसाट! जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी डल्ला

चाळीसगाव, भडगाव आणि जामनेरमध्ये घरफोडी-चोरीचे सत्र

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धुमाकूळ घातला आहे. मागील २४ तासांत चाळीसगाव, भडगाव आणि जामनेर या तीन महत्त्वाच्या ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकडवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

चाळीसगावात २.४८ लाखांची घरफोडी; २ लाख रोख लंपास

चाळीसगाव शहरातील वाल्मिक नगर, घाट रोड परिसरात राहणारे उमर खान उस्मान खान (६३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लुटमार केली. दिनांक २६ ते २८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातून ५ ग्रॅमची सोन्याची आय रिंग, ३ ग्रॅम व १.५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि तब्बल २ लाख रुपयांची रोकड (५०० च्या ४०० नोटा) असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सफौ छबुलाल नागरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भडगाव पेठेत ७२ हजारांची लूट

भडगाव शहरातही चोरट्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले आहे. भडगाव पेठेतील रहिवासी योगेश रावण नरवाडे (३०) यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील हॉल आणि देवघरातील सामान अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी २४ हजार रुपयांची रोकड आणि ४८ हजार रुपये किमतीची ११ ग्रॅमची सोन्याची मिनी पोत व पदक असा एकूण ७२ हजार रुपयांचा माल पळवला. पोहेकाँ गोवर्धन बोरसे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

जामनेर बस स्थानकावर वयोवृद्ध महिलेची 'गहू मणी पोत' चोरीला

जामनेरमध्ये बस स्थानक परिसरात चोरट्यांनी एका वयोवृद्ध महिलेला लक्ष केले. मेणगाव येथील रहिवासी उषाबाई विठ्ठल पाटील (६०) यांची ३० ग्रॅम वजनाची आणि ९० हजार रुपये किमतीची 'गहू मणी' सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबवली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे. पोहेकॉ बाळू भोई या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जिल्ह्यात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चाळीसगाव, भडगाव आणि जामनेर या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले असले तरी आरोपी अटक नाही हाच शेरा सध्या पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT