जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शंभर टक्के संगणकीकरण झाल्यामुळे दरमहा मोठ्या प्रमाणावर वीज वापर होत असून लाखो रुपयांचे वीज बिल येत होते. हा खर्च कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीवर सोलर प्रकल्प उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक (जळगाव भाग) कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आदी विविध विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग पूर्णतः संगणकीकृत असून दरमहा सुमारे १०,००० ते ११,००० युनिट वीज वापर होत होता.
दररोज किमान ३०० युनिट वीज निर्मिती होणार
आता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावर सुमारे ४,००० ते ५,००० चौरस फूट जागेत १८४ सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. या सोलर प्रकल्पामुळे दररोज किमान ३०० युनिट वीज निर्मिती होणार असून उन्हाळ्यात ही क्षमता ४०० ते ४५० युनिटपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कार्यालयाचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अतिरिक्त वीज निर्मितीही शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार उपस्थित होते.