जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीचा कोणताही कर किंवा जिल्हा परिषदेची कोणतीही फी प्रलंबित असल्यास, ती 31 मार्च 2025 पूर्वी भरणा करावी, अन्यथा अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी 31 मार्चपूर्वी थकबाकी भरावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन
जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 (ह) अंतर्गत अर्ज दाखल होत असतात. या अधिनियमानुसार, कराची पावती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कर न भरल्यास संबंधित सदस्य, सरपंच किंवा उपसरपंच यांना पदावरून अपात्र ठरविण्यात येऊ शकते.
जर कराची पावती मिळाली नसेल, तर जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती घेऊन मुदतीपूर्वी भरणा करावा. अंतिम मुदतीबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
31 मार्चच्या आत कर भरल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 (ह) अंतर्गत कोणतीही कारवाई होणार नाही. मात्र, मुदत संपल्यानंतर कर न भरल्यास संबंधित व्यक्ती अपात्र होऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.