Jalgaon Gram Panchayat Reservation Draw
जळगाव: जिल्ह्यातील राजकीय हवा आता थेट गावपातळीवर तापणार आहे! मुदत संपलेल्या तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा अधिकृत आणि विस्तृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
येत्या १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत ही आरक्षण सोडत काढली जाणार असून, १७ जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात जिल्ह्यातील 'गावकी'च्या राजकारणाचा धुरळा उडणार असून, आरक्षण काय निघतंय याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांनी आतापासूनच आपापल्या सोयीच्या प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांपर्यंत जागा राखून ठेवल्या जातील. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी यांचे एकत्रित आरक्षण एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे कडक आदेश आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याची अंतिम जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
असा असेल आरक्षणाचा 'क्रॅश कोर्स' (महत्त्वाचे टप्पे)
तारीख
नियोजित कार्यक्रम
८ जून
आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची नोटीस/सूचना जारी होणार.
१२ जून
तहसीलदार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा भरवून आरक्षणाची सोडत निघणार.
१९ जून
प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप (ड्राफ्ट) अधिकृतपणे प्रसिद्ध केले जाणार.
१९ ते २५ जून
जाहीर आरक्षणावर नागरिकांना आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदत.
०३ जुलै
आलेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी (SDO) आपला अंतिम अभिप्राय नोंदवणार.
०८ जुलै
उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय तपासून जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस मंजुरी देणार.
१० जुलै
जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेली अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जनतेसाठी जाहीर होणार.