जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक आणि शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ना मस्टर ठेवले जाते, ना थंब मशीन उपलब्ध आहे. कर्मचारी कधी येतात आणि कधी निघून जातात याचा कोणताही अधिकृत लेखाजोखा नसतानाही त्यांचे पगार मात्र नियमितपणे होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय शिस्त आणि शासनाच्या निधीच्या वापराबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
हजेरी नोंद नाही, तरीही पगार नियमित
शासकीय नियमांनुसार कार्यालयात हजेरी मस्टर किंवा थंब मशीन अनिवार्य असते. तरीही जिल्हाधिकारी कक्षाजवळील स्वीय सहाय्यक आणि शिपाई कर्मचाऱ्यांसाठी अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसते. विभागातीलच काहीजण “येथे हजेरीचा मास्तर नाही” असे सांगत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.
दरम्यान, काही विभागांचे पगार अद्याप थकलेले आहेत, अशा तक्रारी असताना, ज्यांच्या उपस्थितीचा पुरावा नाही अशा कर्मचाऱ्यांचे पगार मात्र नियमितपणे ट्रेझरीतून होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शिस्तभंगाचा मुद्दा गंभीर
जिल्हाधिकारी कार्यालयातच अशा प्रकारची ढिसाळ हजेरी व्यवस्था असल्याने इतर विभागांमध्ये काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
एनआयसी कार्यालयात थंब सिस्टम ठेवलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या मस्टर नाही, परंतु लवकरच थंब सिस्टम बसवली जाईल.जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक अमोल
जेवढी बिले येतात तेवढीच पेड केली जातात. कोणाचा पगार झाला किंवा नाही याची नोंद त्यांच्याकडे स्वतंत्रपणे नसते.राजेंद्र खैरनार, कोषागार अधिकारी
या सर्व प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हजेरी व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.