Mahayuti vs MVA Jalgaon
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सर्वपक्षीय पॅनल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही बाजूंमध्ये जागावाटपाबाबत पडद्यामागे चर्चा सुरू असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका प्रमुख राजकीय नेत्यानेही या घडामोडींना दुजोरा दिल्याने चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
जागावाटपासाठी प्रस्तावांची देवाणघेवाण
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून एकमेकांना सर्वपक्षीय पॅनलचे प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. कालपासून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू असून, आजही नेत्यांच्या बैठका आणि खलबतांचे सत्र सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय पॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने महायुतीकडे प्रत्येकी दोन जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसलाही या पॅनलमध्ये स्थान देण्याची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तडजोड न झाल्यास थेट लढतींची शक्यता
सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी तडजोडीचे गणित जुळले नाही तर निवडणुकीचा सामना अटळ ठरणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे चर्चा फिस्कटल्यास अनेक मतदारसंघांत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे ठाकतील. परिणामी, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (दि. १७) शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही बाजूंचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते अंतिम तोडगा काढण्यासाठी बैठकांमध्ये व्यस्त आहेत. महाविकास आघाडीचे नेते अंतर्गत चर्चा करून आज सायंकाळपर्यंत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय समझोत्यातून बिनविरोध होणार की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट राजकीय संघर्ष रंगणार, याचा फैसला लवकरच होणार आहे. સમગ્ર जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.