Sanjay Pawar Criticism On Satish Patil Pudhari
जळगाव

Jalgaon Politics | ‘२० वर्षांत सुनेलाही निवडून आणता आले नाही’; संजय पवारांची सतीश पाटलांवर बोचरी टीका

जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

NCP Internal Dispute

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

‘सलग २० वर्षे राजकारणात असूनही स्वतःच्या मतदारसंघात विकास सोसायटीचा ठराव करता आला नाही. स्वतःच्या सुनेलाही निवडून आणता आले नाही, मग तुमची काय बोंब पडली?’ असा सवाल पवार यांनी केला. कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जागा मागण्याऐवजी स्वतःसह कुटुंबासाठी जागा मागितल्याचा आरोपही त्यांनी केला.

डॉ. पाटील यांनी शरद पवार यांना श्रद्धास्थान मानून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्यानंतर सत्तेसाठी अजित पवार गटात प्रवेश केला, असा टोलाही संजय पवार यांनी लगावला.

दरम्यान, गुलाबराव देवकर यांनीही डॉ. पाटील यांचे आरोप फेटाळले. ‘माघारीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ बसले होते. नेमका कोणाचा फोन किंवा आदेश आल्यानंतर त्यांनी माघार घेतली, हे त्यांनीच स्पष्ट करावे,’ असे आव्हान देवकर यांनी दिले.

डॉ. पाटील यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, असा दावा करत पवार आणि देवकर यांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. तसेच चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत घड्याळ चिन्हाविरोधात काम केल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करून शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे देवकर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील एका जागेवरून सुरू झालेला हा वाद आता उमेदवारी, पक्षनिष्ठा, घराणेशाही आणि आगामी राजकीय समीकरणांपर्यंत पोहोचला आहे. डॉ. सतीश पाटील यांच्या आरोपांना संजय पवार आणि गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाले आहेत. या प्रकरणी पक्षाचे प्रदेश नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT