जळगाव : येथील पाळधी महामार्ग वाहतूक पोलीसांकडून रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. यासाठी भुसावळ येथील सेंड अलायसेंस शाळेत शुक्रवार (दि.10) रोजी वाहतूक नियमाबाबत जनजागृती व हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालक व मालक यांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करून रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. रोड अपघाताचे अवलोकन केले असता असे समजून आले आहे की, बहुतांश मोटार सायकल चालक व त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती हेल्मेट परिधान करत नाहीत. परिणामी मोटार सायकल अपघात झाल्यास जखमी व मूत्युचे प्रमाण जास्त वाढत आहेत. वयस्क व्यक्ती हेल्मेट घालत नसल्याने शाळेतील मुलांनी त्यांच्या पालकांना हेल्मेट परिधान करण्यास सांगितल्यास हेल्मेट बाबत जागरुकता निर्माण होवून हेल्मेटचा वापर वाढेल. यासाठी शाळेतील मुलांना हेल्मेट वाटप करण्याची संकल्पना आय सी आय सी आय लोबार्ड मुंबई यांनी ठेवली आहे.
महामार्ग पोलीस पाळधीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सैयद यांनी सांगितले की, कंपनीकडून हेलमेट उपलब्ध करुन देण्यात येत असून शुक्रवार (दि.10) रोजी सकाळी भुसावळ येथील सेंट अलायसेस शाळेत आय सी आय सी आय लोबार्ड मुंबई कंपनीच्या सौजन्याने हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात पोलीस उप अधिक्षक, महामार्ग नाशिक विभागाचे कदम, भुसावळ विभागाचे डि वाय एस पी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक गोपनारायण, आय सी आय सी आय लोबार्ड मुंबई कंपनीचे नझीम खान हे उपस्थित राहून मुलांना वाहतुकीचे नियमांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.