जळगाव

Jalgaon Crime | धरणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गिरणा पात्रात 'पिस्तुलधारी' जेरबंद

२५ हजारांचे गावठी बनावटीचे 'सिल्व्हर' पिस्तुल जप्त; जळगावचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

धरणगाव : शहरासह तालुक्यात अवैध शस्त्रांची वाढती व्याप्ती लक्षात घेता, धरणगाव पोलिसांनी गिरणा नदीच्या पात्रात मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या जळगाव येथील एका ३९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून मॅगझीनसह सिल्व्हर रंगाचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील सिद्धार्थ नगर (आव्हाणे परिसर) मधील रहिवासी असलेला संशयित आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९) हा धरणगाव तालुक्यातील दोनगाव शिवारात गिरणा नदीच्या पात्रात संशयास्पदरित्या फिरत होता. त्याच्याकडे घातक शस्त्र असल्याची गुप्त माहिती धरणगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे, लोखंडी आणि सिल्व्हर रंगाचे मॅगझीन असलेले पिस्तुल आढळून आले.

सदर शस्त्राचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीला तात्काळ अटक केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नथ्थु सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर आणि त्यांच्या पथकाने १४ मे २०२६ रोजी रात्री केली. गिरणा पात्रात हा तरुण पिस्तुल घेऊन नेमका कोणत्या उद्देशाने आला होता? यामागे एखादे मोठे रॅकेट आहे का? याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बडगुजर करत आहेत. जळगाव जिल्ह्यात वाढत्या 'पिस्तुल संस्कृती'ला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची किंवा विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT