जळगाव

Jalgaon : शहराचा विकास की भकास? कोट्यवधींच्या रस्त्यांचे काम अपूर्णच; नागरिक त्रस्त पण अधिकारी म्हणतात “लवकरच”

नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना रोजचाच त्रास

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरात विकासाच्या घोषणा होत असतानाच, खडका रोड ते सुभाष पोलीस चौकीदरम्यानचा कोट्यवधी रुपयांचा रस्ता गेल्या चार-पाच महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्याचे काम फक्त एका बाजूला झाले असून दुसऱ्या बाजूचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.

अपूर्ण कामे

तळले कॉलनीपासून पाटील नर्सरीपर्यंतचा रस्ता सध्या धुळीने माखलेला आणि खड्ड्यांनी चाळण झालेला आहे. नाल्याची भिंत कोसळल्याने काम थांबले असल्याचे कारण दिले जात असले तरी, प्रत्यक्षात गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही हालचाल नाही. रस्त्याचा एक भाग बंद असल्याने वाहनचालकांना उलट दिशेने जाण्याची वेळ येते आणि त्यामुळे अपघाताचा देखील धोका वाढला आहे.

विद्यार्थ्यांची धावपळ

दररोज सकाळी शाळा-कॉलेजकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरत आहे. अपूर्ण रस्त्यांमुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.

शहर परिसरात घाणीचे साम्राज्य

या भागातील नाल्यांमध्ये कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, तरीही नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधा प्रशासनाच्या अजेंड्यावर नाहीत, अशी भावना व्यक्त होत आहे.

रस्ते कामांमध्ये डांबरावरच सिमेंट

रस्त्याच्या कामात वापरलेल्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतर ठिकाणी डांबर काढून सिमेंट काँक्रिट केले जाते, मात्र येथे डांबरावरच सिमेंट टाकण्यात आले आहे. त्यामुळे खर्चही दुपटीने वाढल्याचा आरोप नागरिक करत आहेत. हे तंत्रज्ञानाचा भाग आहे की अनियमिततेचा, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

‘पावसाळा संपला, तरी काम नाही’ अधिकाऱ्यांनी पावसाळ्याचे कारण देत काम थांबवल्याचे सांगितले होते, परंतु आता पावसाळा संपूनही काम सुरू झालेले नाही. ठेकेदार दुसरीकडे काम करत असल्याने विलंब झाला आहे. मात्र रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.
सी. डी. तायडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता

अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिकांनी स्वतः बांधकामाचे साहित्य वापरून रॅम्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना स्वतःहून उपाय शोधावे लागत असल्याची लज्जास्पद वेळ आली आहे. जर प्रशासनाने तत्काळ लक्ष दिले नाही, तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे. विकासाचे दावे वास्तवात उतरवायचे असतील, तर अपूर्ण रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करणे हीच वेळेची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT