Youth End Life Jalgaon  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या, मानसिक छळ, तरुणाने उचलेले टोकाचे पाऊल

देऊळवाडा (ता. जळगाव) येथील घटनेने खळबळ; मायलेकांसह तिघांवर तालुका पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Youth End Life Jalgaon

​जळगाव : मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याचा भयानक राग मनात धरून सतत दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मानसिक त्रासाने एका तरुणाचा बळी घेतला आहे. देऊळवाडा (ता. जळगाव) येथील प्रशांत संजय सोनवणे (वय २८) या तरुणाने आसोदा उड्डाणपुलाजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही थरारक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित संदीप महाजन, त्याचा भाऊ आणि आई अशा तिघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत सोनवणे याच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला प्रशांतचा सक्त विरोध होता. हाच विरोध संदीपच्या चांगलाच जिव्हारी लागला. यातूनच संशयित संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल महाजन आणि त्यांच्या आईने प्रशांतचा जाच सुरू केला. प्रशांतला वाटेत अडवून धमकावणे, अपमानित करणे आणि सतत मानसिक छळ करणे असा प्रकार या तिघांनी चालवला होता.

गुंड प्रवृत्तीच्या या संशयितांच्या सततच्या त्रासामुळे प्रशांत प्रचंड मानसिक विवंचनेत वावरत होता. अखेर संशयितांच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी सकाळी आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिरामागे शेताच्या बांधावर गळफास घेतला. ऐन पंचविशीतील तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने देऊळवाडा परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडित कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT