जळगाव : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना बांधकामाच्या विविध कामांच्या शिफारसी देण्यात आलेल्या आहेत मात्र कामापोटी जिल्हा परिषदेला भरावयाची सुरक्षा अनामत रक्कम ज्यांनी अजूनही भरलेली नाही. त्यांनी शुक्रवारपर्यंत ती भरावी, अन्यथा देण्यात आलेल्या शिफारसी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिला. ते गुरुवारी (दि.१३) जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठकीत बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणारी कामे, अपूर्ण कामांवर झालेला खर्च व त्यांची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला. त्यासोबतच अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांनी सुरू असलेल्या कामांना भेटी देणे त्यासोबतच सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात पाऊले उचलणे पूर्ण झालेल्या कामांची २८ मार्चपर्यंत बिले अदा झाली पाहिजे, पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यास लागणारा विलंब लक्षात घेता देयके अदायगी वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार अभियंता कामांसंदर्भात शिफारशी देण्यात आल्या आहेत मात्र त्यांनी अद्यापपर्यंत अनामत रक्कम भरलेली नाही व कामे देखील सुरू झालेली नाहीत, अशा शिफारशी धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत सुरक्षा अनामत रक्कम न भरल्यास शिफारशी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या बैठकीत दिला.