जळगाव : संपूर्ण जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ जाहीर करावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित अकरा तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले असल्याचे सांगत, सर्व तालुक्यांचा समावेश करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
महाविकास आघाडीने इशारा दिला की, जर शासनाने संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही, तर जिल्ह्यातील चारही मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. या आंदोलनात काँग्रेस, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मदत योजनेत संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा. अतिवृष्टी, पुर आणि ओल्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कापूस, सोयाबीन, केळी, मूग, उडीद, ज्वारी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत देण्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी मागणी करण्यात आली.