Dakshata petrol pump fraud Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जळगावात पोलीस दलाशी संबंधित पेट्रोल पंपावर कोटींचा अपहार; व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

१० महिन्यांत १.३३ कोटींची रक्कम बँकेत न भरता अफरातफर

पुढारी वृत्तसेवा

Dakshata petrol pump fraud

जळगाव : शहराच्या मध्यवस्तीत, भास्कर मार्केटसमोरील आणि पोलीस दलाशी संबंधित असलेल्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावर तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा गैरप्रकार पंपाच्या व्यवस्थापकानेच केल्याचा आरोप असून, त्यामुळे शहरासह पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

१० महिन्यांचा घोटाळा उघड

माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा झालेली रक्कम अधिकृत बँक खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मात्र, व्यवस्थापक वाल्मीक मधुकर वाघ याने ही रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. सुमारे दहा महिन्यांत अपहाराची रक्कम १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांपर्यंत पोहोचली.

गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप उत्तमराव पाटील (अतिरिक्त कार्यभार, मानव संसाधन विभाग) यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली असून, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे सहकार्य करत आहेत.

तपासासमोर प्रश्नचिन्हे

इतक्या मोठ्या रकमेचा अपहार तब्बल दहा महिने लक्षात कसा आला नाही? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT