जळगाव : झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने आणि डिजिटल अरेस्टच्या भीतीपोटी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सायबर भामट्यांनी अक्षरशः कंगाल केले आहे. सन २०२४ ते २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत सायबर भामट्यांनी तब्बल ३३ कोटी ९१ लाख ८१ हजार ४२३ रुपयांची ऑनलाइन लूट केल्याची धक्कादायक माहिती जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकृत आकडेवारीवरून समोर आली आहे. या कालावधीत 'एनसीसीआरपी' पोर्टलवर एकूण १० हजार ४३ तक्रारींची नोंद झाली असून प्रत्यक्ष सायबर पोलीस ठाण्यात १५५ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
सायबर भामट्यांनी जळगावकरांना सर्वाधिक गंडा शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडच्या नावाखाली घातला आहे. दाखल झालेल्या १५५ गुन्ह्यांपैकी सर्वाधिक ५६ गुन्हे हे केवळ शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीचे आहेत. त्यापाठोपाठ गेल्या काही महिन्यांत दहशत माजवणारे 'डिजिटल अरेस्ट'चे १९ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय टास्क फ्रॉडचे १४, .APK फाइल फ्रॉडचे ५ आणि सेक्सटॉर्शनचे २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
२०२४ मध्ये पोर्टलवर केवळ ५२१ तक्रारींची नोंद झाली होती. मात्र, २०२५ मध्ये हा आकडा थेट ४ हजार ७२९ वर आणि २०२६ मध्ये तब्बल ४ हजार ७९३ तक्रारींवर पोहोचला. वर्षनिहाय तक्रारींचा हा वाढता आलेख जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
नागरिकांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली असताना सायबर पोलिसांनी तातडीने हालचाली करत विविध बँक खात्यांमधील १९ कोटी ३२ लाख २८ हजार ४५२ रुपयांची रक्कम गोठवण्यात (फ्रीज करण्यात) यश मिळवले आहे. यामध्ये २०२५ या वर्षात सर्वाधिक १६ कोटी ३० लाख ८२ हजार १६६ रुपयांची रक्कम गोठवण्यात आली.
२०२४ : ७७ गुन्हे दाखल, ५२१ तक्रारी; फसवणूक : १६ कोटी ३९ लाख २१ हजार ०४८ रुपये.
२०२५ : ४३ गुन्हे दाखल, ४,७२९ तक्रारी; फसवणूक : १० कोटी ३३ लाख ५८ हजार १५१ रुपये.
२०२६ : ३५ गुन्हे दाखल, ४,७९३ तक्रारी; फसवणूक : ७ कोटी १९ लाख ०२ हजार २२४ रुपये.
अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, कोणतीही .APK फाइल डाऊनलोड न करणे तसेच कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून फोनवर 'डिजिटल अरेस्ट' केले जात नाही, याचे भान नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा स्थानिक सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.