भुसावळ शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक केली आहे.  Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Crime : दोन गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपी अटकेत

रेकॉर्डवरील आरोपींवर पोलीसांची करडी नजर

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या निर्देशानुसार रेकॉर्डवरील आरोपींवर नजर ठेवण्याचे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस कर्मचारी विजय नेरकर आणि जावेद शहा हे रात्रीच्या गस्तीदरम्यान असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकूर (वय 19, रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा रेगोली हॉटेलजवळील त्रीमूर्ती प्रोव्हिजन समोर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह थांबला आहे.

जप्त करण्यात आलेले गावठी पिस्तुल

मिळालेल्या माहितीच्या आधारे डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नेरकर, राजेश काळे, जावेद शहा, पंकज तायडे, सुनिल सोनवणे आणि चालक हसमत अली सय्यद यांनी छापा टाकला. त्यावेळी कुणाल ठाकुर यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत काडतुसे आढळली.

कुणाल ठाकुरवर गुन्हा क्रमांक 488/2025 असा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम 3/25, 5/25 सह म.पो.का. कलम 37(1)(135) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान कुणाल ठाकुर याने ही पिस्तूल उदय राजू उजलेकर (वय 24, रा. वरणगाव) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार उजलेकर यास अटक करून त्याच्याकडून वरणगाव येथून आणखी एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

दोन्ही आरोपींकडून एकूण 58 हजार रुपये किमतीच्या दोन लोखंडी गावठी पिस्तुली आणि 3 हजार रुपये किमतीच्या तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी विजय बळिराम नेरकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT