जळगाव

Jalgaon Crime | दरोडेखोरांचा थरारक पाठलाग; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

दरोड्यासाठी वापरण्यात येणारी विविध शस्त्रे जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) थरारक पाठलागानंतर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून चोरीचा बैल तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारी विविध शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवार (दि.१५) रोजी रात्री ११ ते १६ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान, एलसीबीचे पथक भुसावळ व मुक्ताईनगर उपविभागात गस्त घालत असताना, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंड गावात एका इनोव्हा वाहनातून चार संशयित दरोड्याच्या तयारीत उतरताना दिसले. पोलिसांचे वाहन पाहताच संशयित पळ काढत डोलारखेडा फाट्यावरून नागपूर महामार्गाच्या दिशेने भरधाव निघाले.

संशयितांनी पळ काढताच पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपी चालकाने शासकीय वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केला. यानंतर जळगाव नियंत्रण कक्षाने मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला येथील पोलिसांना सतर्क केले. अखेर साेमवार (दि. 16) रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात ट्रक आडवा लावून नागपूर-धुळे महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. याठिकाणी इनोव्हा वाहन बंद पडले होते. वाहन बंद पडल्याने तिघे आरोपी आणि एक इसम पळून जाण्याच्या तयारीत होते. याचवेळी पोलीस पथकाकडून वाहनचालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता चोरीच्या काळ्या रंगाचा बैल, तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉड, दोर व कपडे अशा दरोड्यात वापरण्यात येणाऱ्या वस्तू सापडल्या. ही सर्व वस्तू जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथे जप्त करण्यात आल्या.

फरार आरोपींची नावे उघड

अरबाज खानच्या चौकशीतून सैय्यद फिरोज उर्फ अनडूल सैय्यद झहीर, अफजल सैय्यद, इम्रान, तन्नू उर्फ तन्वीर, अफरोज खान उर्फ अण्प्या अशी फरार आरोपींची नावे समोर आली आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अनिल जाधव, दर्शन ढाकणे, रवी नरवाडे, सुनील दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, श्रीकृष्ण देशमुख, भरत पाटील तसेच जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथील पोउपनिरीक्षक रवींद्र करणकर, प्रमोद शिंदे, स्वप्नील पोधाडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT