जळगाव : जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, गेल्या काही दिवसांत शहर आणि वरणगाव परिसरात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. चोरट्यांनी मिळून सुमारे ४ लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे.
संत सावतानगर, जळगाव
गट नं. ७६२, प्लॉट नं. २२ येथील बंद घराचे कुलूप तोडून ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या काळात चोरी करण्यात आली. चोरट्यांनी ५९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मनगटी घड्याळ चोरले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस रामकृष्ण इंगळे करीत आहेत.
वरणगाव – सुशी नगर
आयुध निर्माणीमध्ये कार्यरत सिद्धार्थ अशोक थाटे यांच्या सुशी नगरमधील बंद घरात ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी झाली. चोरट्यांनी बेडरूममधील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पलायन केले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करीत आहेत.
दर्यापूर पोस्ट ऑफिसजवळ, वरणगाव
ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणारे आदिनाथ पूना पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी कपाटातील लॉकर फोडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची भांडी, अत्तरदाणी आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ७ हजारांचा ऐवज लंपास केला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी यांच्या अखत्यारीत आहे.
जिल्ह्यात अल्पावधीत तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.