Knife Attack Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | साकेगावला गजबजलेल्या बसस्थानकात तरुणाच्या मानेवर भिरकावला चाकू!

तीन दिवसांत दुसरा थरार; हल्लेखोर हवेत पसार, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : ​भुसावळपरिसरातील साकेगावमध्ये गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की, मंगळवारी सायंकाळी भरचौकात, लोकांच्या डोळ्यादेखत एका २५ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार चाकू खुपसून हल्लेखोर पसार झाले. राहुल सपकाळे असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याला रक्ताच्या थारोळ्यात गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवघ्या ७२ तासांत साकेगावात घडलेली ही दुसरी चाकू हल्ल्याची घटना असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट दिसत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी राहुल सपकाळे हा दुचाकीवरून नेहमीप्रमाणे गजबजलेल्या साकेगाव बसस्थानक चौकात आला होता. त्याचवेळी भुसावळच्या दिशेने आलेल्या काही टोळक्यांसोबत त्याचा जोरदार वाद उफाळला. बाचाबाची शिगेला पोहोचताच टोळक्यातील एकाने थेट धारदार चाकू उपसून राहुलच्या मानेवर प्राणघातक वार केला. वार इतका भयंकर होता की राहुल रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळला.

ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या रक्ताळलेल्या थरारामुळे चौकातील नागरिकांची आणि दुकानदारांची पळापळ झाली. राहुल कोसळताच हल्लेखोर घटनास्थळावरून सहज पसार होण्यात यशस्वी ठरले. नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी हलविले.

​दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी, आज बसस्थानक!

साकेगाव आणि भुसावळ परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, दोनच दिवसांपूर्वी भुसावळ-साकेगाव एमआयडीसी मार्गावर एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला होता. ती घटना ताजी असतानाच थेट मध्यवर्ती चौकात दुसरा हल्ला झाल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचे पितळ उघडे पडले आहे.

या दोन्ही हल्ल्यांमागे काही जुने वैमनस्य आहे की टोळीयुद्ध भडकले आहे, अशी जोरदार चर्चा आता साकेगावात सुरू आहे. भरचौकात रक्ताचा सडा पडत असताना पोलीस प्रशासन केवळ तपास करत बसणार की या गुंडांच्या मुसक्या आवळणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT