जळगाव

Jalgaon Crime | 'गीतांजली एक्सप्रेस'मधून तब्बल १० लाखांचा गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस'अंतर्गत धडक कारवाई!

​आरपीएफ श्वान 'वीरू'ने शोधला २० किलो गांजा; कानपूरचा भामटा भुसावळ स्थानकावर जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

​भुसावळ: रेल्वे मार्गाने होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भुसावळ विभाग रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) 'ऑपरेशन नारकोस'अंतर्गत मोठी कामगिरी बजावली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. १६) ‘गीतांजली एक्सप्रेस’मधून उतरलेल्या एका परप्रांतीय प्रवाशाकडून १९.९५९ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९ लाख ९७ हजार ९५० रुपये असून, या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी ट्रेन क्र. १२८६० गीतांजली एक्सप्रेस भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. त्यावेळी ड्युटीवर तैनात सुरक्षा आरक्षक लोकेश्वर यादव यांना दुसऱ्या डब्यातून खांद्यावर पांढरी गोणी घेऊन संशयास्पदरीत्या उतरणारा एक युवक दिसला. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन गोणीबाबत विचारपूस केली असता, त्याने त्यात गांजा असल्याचे कबूल केले.

​घटनेचे गांभीर्य ओळखून आरपीएफने तत्काळ शोधक श्वान 'वीरू'ला पाचारण केले. श्वान वीरूने खात्री देताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोणीची झडती घेण्यात आली. त्यातून गांजाचे १० बंडले आढळली.

​आरोपी जीआरपीच्या स्वाधीन

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरुण कुमार उर्फ सोनू लालू प्रसाद (वय २५, रा. चरतीपुर, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. ही कारवाई सहाय्यक सुरक्षा आयुक्त जितेंद्र सिंहा, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह, सीआयबीचे कॉन्स्टेबल कपिल कुमार व जीआरपी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. जीआरपी भुसावळ यांनी १७ ऑगस्ट रोजी आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT