मृत आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय तर मारेकरी संदीप पाटील  
जळगाव

Jalgaon Crime: पद्मालय वनक्षेत्रातील हत्येचे गूढ उकलले, खाकी वर्दीचे स्वप्न बघणारा तरुणच निघाला तृतीयपंथीयाचा मारेकरी

एका 'बिअरच्या बाटली'मुळे मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र पद्मालयाजवळील जंगलात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. एका 'बिअरच्या बाटली'मुळे मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारा एक तरुणानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले असून मृत व्यक्ती ही तृतीयपंथी होता.

काय आहे प्रकरण?

4 फेब्रुवारी रोजी पद्मालय परिसरातील जंगलात बकऱ्या चारणाऱ्या मुलांना एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे ओळख पटू नये अशा स्थितीत जाळण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांना बिअरची एक रिकामी बाटली मिळून आली. हीच बाटली तपासाचा केंद्रबिंदू ठरली.

आरोपी कोण?

आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय (वय 26, रा. छत्तीसगड) असे मयत तृतीयपंथीयाचे नाव असून जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहणारा संदीप पाटील (वय 21) हा आरोपी आहे. 31 जानेवारी रोजी त्याने पद्मालय वनक्षेत्रात आकांक्षाची हत्या केली होती.

'त्या' सिरीयल नंबरने केला गेम!

शवविच्छेदनानंतर हा खून ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट झाले. डोक्यात बिअरची बाटली मारून आणि गळा आवळून हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळला होता. घटनास्थळी सापडलेल्या बिअरच्या बाटलीवरील 'सिरीज नंबर' वरून पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप आणि बिअर बार पिंजून काढले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाद्वारे एका दुकानात युपीआय (UPI) पेमेंट झाल्याचे समोर आले. याच धाग्यावरून पोलिसांनी संदीप पाटील याला ताब्यात घेतले.

वर्दी मिळवण्याआधीच कोठडीची हवा

आरोपी संदीप पाटील हा बारावी पास असून नाशिक येथे एका केंद्रात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. तिथेच त्याची ओळख छत्तीसगडमधील आकांक्षा गेंद्रे या तृतीयपंथीयाशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी वाद सुरू झाले. आकांक्षाने संदीपच्या प्रशिक्षण केंद्रात आणि त्याच्या गावी जाऊन 'तमाशा' केला होता. या बदनामीचा बदला घेण्यासाठी संदीपने तिला पद्मालय येथे फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे तिचा काटा काढला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, डीवायएसपी विनायक कोते (अमळनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय शरद बागल, सोपान गोऱ्हे, ईश्वर पाटील व त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. खाकी वर्दी अंगावर चढवून गुन्हेगारांना पकडण्याचे स्वप्न पाहणारा संदीप, आज स्वतःच एका बिअरच्या बाटलीमुळे खुनाच्या गुन्ह्यात गजाआड झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT