सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्वा रहीम शेख  
जळगाव

Jalgaon Crime | सराईत गुंड 'तन्वा' येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; ११ गंभीर गुन्ह्यांसह १३ अदखलपात्र गुन्ह्यांची होती नोंद थेट पुण्याच्या येरवडा जेलमध्ये रवानगी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील अत्यंत धोकादायक व सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्वा रहीम शेख (वय २१, रा. नूरानी मशिदीजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला थेट पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १४ ऑगस्ट रोजी याबाबतचे अंतिम आदेश दिले.

स्थानबद्ध करण्यात आलेला तन्वीर ऊर्फ तन्वा हा अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा गुन्हेगार असून त्याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये:

०२ जबरी चोरी

०१ सरकारी नोकरावर हल्ला

०४ प्राणघातक/गंभीर दुखापत

०१ दुखापतीसह दंगा (राईट)

०१ घरफोडी व आगळीक

०१ बेकायदेशीर शस्त्रास्त्र कायदा (आर्म अ‍ॅक्ट)

याशिवाय त्याच्यावर १३ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

तन्वा शेख याच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी अनेकदा प्रतिबंधक कारवाया केल्या होत्या. २५ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्याकडून फायनल बाँड घेण्यात आला होता, तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार (दि. २३/०१/२०२६) त्याला ०३ महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार देखील करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही व तो सातत्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत गुन्हे करतच राहिला.

गुन्हेगाराच्या वाढत्या विघातक कृत्यांमुळे जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी एम.पी.डी.ए. कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सोपवला. एलसीबीमार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची गंभीर दखल घेत १४ ऑगस्ट रोजी आदेश (क्र. दंडप्र कावि/एमपीडीए/०४/२०२६) पारित करून आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.

पोनि. सागर शिंपी, सपोनि. सुरेश आव्हाड, मपोउनि. भांडारकर, सफौ. दीपक शिरसाठ, पोकॉ. सतीश पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार, राहुल पांचाळ, दीपक पाटील व दिनेश कंखरे यांच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी आरोपी तन्वा शेख याला ताब्यात घेऊन थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात रवाना केले.

ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सफौ. सुनील दामोदरे, सफौ. जयंत चौधरी, पोहेकॉ. रफिक शेख आणि पोहेकॉ. संदीप चव्हाण यांनी पार पाडली.

"गणेशोत्सवाच्या काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही; गुंडांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
— जिल्हा पोलीस दल, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT