जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी अकारऊत येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत एका बंद घराचे कडी-कोयंडे तोडून सुमारे १ लाख ६७ हजार १०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. फिर्यादी महिला आपल्या आईकडे झोपायला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी अकारऊत येथील रहिवासी सुनीता कैलास पाटील (वय ५३) या शेती मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्या आपल्या घराला कुलूप लावून गावातच राहणाऱ्या त्यांच्या आई राधाबाई पाटील यांच्याकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास सुनीता पाटील घरी परतल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता कपाट आणि लाकडी कॉटमधील सामानाची उचकापाचक झालेली होती आणि त्यातील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. यात ७ ग्रॅमची सोन्याची पोत व पेंडंट (किंमत १० हजार), २२ ग्रॅमच्या सोन्याच्या साखळ्या व झुमके (किंमत ६६ हजार), ७ ग्रॅमची सोन्याची लगड (किंमत ४९ हजार), ४ ग्रॅमच्या दोन लहान सोन्याच्या लगडी (२० हजार), ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र (किंमत १५ हजार, चांदीचा आकडा, चांदीचे गोळे आणि १० भार चांदीचे शिक्के व घंटी यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, चोरीला गेलेल्या चांदीच्या शिक्क्यावर एका बाजूला तिरंगा आणि दुसऱ्या बाजूला ताजमहालचे चित्र कोरलेले होते. असा एकूण १ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये सुनीता पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. ५१/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही, मात्र पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत.