जळगाव

Jalgaon News | नशिराबादचा चोरटा जेरबंद; १० मोटारसायकलसह पोलिसांनी आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जळगाव शहर, एमआयडीसीसह बुरहानपूरमधील गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरासह परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. नशिराबाद येथील २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहर, एमआयडीसी, जिल्हापेठ आणि थेट मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जुना खेडी रोडवरील रहिवासी कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांची 'हिरो स्लेंडर' एम एच 19 बी व्हाय 7413ही २७ फेब्रुवारी रोजी भानू हॉटेल समोरून अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नशिराबाद येथील समीर शेख शफीक शेख (वय २०, रा. ताज नगर) हा संशयितरीत्या फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून समीरला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या समीरला जेव्हा पोलिसांनी आपला 'खाक्या' दाखवला, तेव्हा त्याने एकापाठोपाठ एक तब्बल १० मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

समीरने केवळ जळगाव शहरच नव्हे, तर एमआयडीसी, जिल्हापेठ आणि चक्क मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथूनही गाड्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीचे आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, अजय पाटील आणि प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रदीप नन्नवरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT