जळगाव : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच मुलींची सुटका करण्यात आली असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिलांना दबावाखाली ठेवून त्यांच्याकडून अवैधरित्या देहव्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नशिराबाद पोलिस आणि जळगाव एएचटीयू (Anti Human Trafficking Unit) पथकाने संयुक्तपणे कारवाई केली.
छाप्यात पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून, दोन चालकांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान एकूण 63,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, फौजदार संजय महाजन, शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर युगंधरा, नारखेडे भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार आणि एएचटीयूच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.