जळगाव : अल्पवयीन मुलीला बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक, ता. जि. जळगाव) याला न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
व्हॉईस क्लिप व्हायरल करण्याची धमकी
अभियोग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०१९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नांद्रा बुद्रुक गावाबाहेरील गिरणा नदीपात्रातील वाळूच्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. आरोपीने पीडितेची बदनामी करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरील व्हॉईस क्लिप इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.
या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ११०/१९ नुसार भारतीय दंड विधानातील कलम ३७६ (डी) (१), ५०६, ३४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम, २०१२ मधील कलम ३, ४, ५, ६, ७, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आठ साक्षीदारांची साक्ष
या गुन्ह्याचा तपास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. पोक्सो कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड, तर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.