जळगाव : समाजातून बालविवाहाची कीड नष्ट करण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न सुरू असताना, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ३२ वर्षीय व्यक्तीशी लावून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर लैंगिक शोषण झाल्याने ही मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असून, याप्रकरणी नराधम पतीसह दोन्ही बाजूंच्या पालकांविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, पॉक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये चिंचपुरा (ता. धरणगाव) येथे हा विवाह पार पडला होता. पीडित मुलगी ही अवघी १७ वर्षांची असताना, ती अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असूनही आरोपी पती सदाशिव सपकाळे (वय ३२) याने तिच्याशी विवाह केला. लग्नानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवले. सध्या ही पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर हा संपूर्ण काळाबाजार उघड झाला.
दोन्हीकडील पालकांवर गुन्हे
केवळ नराधम पतीच नव्हे, तर ज्यांनी हा बेकायदेशीर विवाह लावून दिला, त्या दोन्ही बाजूच्या पालकांनाही पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुलीचे वय झाले नसतानाही तिचा विवाह लावून दिल्याने पीडितेचे आई-वडील आणि आरोपीचे आई-वडील यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२६ नुसार भारतीय न्यायिक संहिता (BNS) कलम ६४ (बलात्कार), मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) चे कलम ४, ८, १२ सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करत आहेत. धरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारवाई करत असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात बालविवाह लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.