Crime pudhari photo
जळगाव

Jalgaon Crime : मेहरूणमध्ये बंद घर फोडून १.५६ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

रजा कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ; १५ ग्रॅमची चैन, झुमके, सोन्याचा तुकडा आणि दोन अंगठ्या चोरीला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील मेहरूण परिसरातील रजा कॉलनीत चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत सोन्याचे दागिने लंपास केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी तब्बल १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. २३ नोव्हेंबरच्या रात्री ते २४ नोव्हेंबरच्या सकाळदरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण येथील रजा कॉलनीतील प्लॉट क्रमांक ११ येथे मोहम्मद सुफीयान गुलाम नबी (वय ४१, व्यवसाय फॅशन डिझायनर) हे कुटुंबासह राहतात. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.

घरातील कपाटातून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ४५ हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, तसेच २१ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी साडेतीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घरफोडीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मोहम्मद सुफीयान गुलाम नबी यांच्या फिर्यादीवरून २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT