Jalgaon Crime | कमरेला देशी कट्टा खोचून फिरणारा किनगावचा तरुण गजाआड! 
जळगाव

Jalgaon Crime | कमरेला देशी कट्टा खोचून फिरणारा किनगावचा तरुण गजाआड!

स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जिवंत काडतुसांसह पवन सोनवणे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर असतानाच, कंबरेला देशी कट्टा खोचून दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावल ते चोपडा महामार्गावर किनगाव शिवारात हॉटेल 'श्री' समोर स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी संयुक्त सापळा रचून ही धडक कारवाई केली. पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आगामी उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार अथवा गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी हद्दीत कडक नाकाबंदी व पेट्रोलिंगचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांचे पथक यावल हद्दीत गुन्हे प्रकटीकरणाच्या कामात असताना, पवन सोनवणे हा बेकायदेशीर देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली.

माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तात्काळ सतर्क करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि यावल पोलीस ठाण्याचे पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोकॉ हितेश बागुल यांनी किनगाव परिसरात वेगाने हालचाली करत सापळा लावला. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल श्री समोर संशयित पवन सोनवणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला खोचलेले लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आणि पॅन्टच्या खिशात २ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी शस्त्र जागेवरच जप्त करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आरोपी पवन सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी, मयुर निकम, सचिन घुगे तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोउनि मैनुद्दीन सय्यद व पोकॉ हितेश बागुल यांनी पार पाडली. आरोपीला यावल न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याने हे बेकायदेशीर हत्यार कुठून आणि कोणासाठी आणले होते? याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT