जळगाव

Jalgaon Crime | मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा; जिल्हापेठ पोलिसांची दमदार कामगिरी, ११ दुचाकींसह ३ आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ११ चोरीच्या मोटारसायकली, एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलप्रकरणी दाखल गुन्हा क्रमांक २१९/२०२६ (कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता) च्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७ मोटारसायकली किंमत २ लाख २० हजार रुपये किंमती जप्त करण्यात आल्या. या दुचाकी जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्यप्रदेशातील विविध भागांतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

याचप्रमाणे गुन्हा क्रमांक १०७/२०२६ च्या तपासात उमेश प्रदीप पाटील (वय २२, रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर, सध्या रायपूर एमआयडीसी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ मोटारसायकली किंमत १ लाख ७५ हजार रुपये जप्त करण्यात आल्या. या चोरीच्या दुचाकी एमआयडीसी व फुले मार्केट परिसरातील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचा संशय असून तपास सुरू आहे.

दरम्यान, १७ जुलै रोजी पेट्रोलिंगदरम्यान कैलास वसंतदास मथुरे (वय २८, रा. जुनोने, ता. जामनेर) हा संशयास्पदरीत्या हिरो HF डिलक्स मोटारसायकलवर फिरताना आढळला. चौकशीत त्याच्याकडील वाहन हे सोयगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा उघड झाले असून त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून आरोपी व वाहन पुढील तपासासाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३ आरोपींना अटक करून ११ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे जळगाव शहरासह परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या उकल होण्यास मोठी मदत झाली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली. या कारवाईत सफौ संजय दोरकर, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, संजय लाटे, अजय आहिरे या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT