Jalgaon Murder | जळगावात कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!  Pudhari file photo
जळगाव

Jalgaon Murder | जळगावात कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

संतापलेल्या पतीने लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर केले वार

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : तालुक्यातील निमखेडी गावात कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी विळ्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १९ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत महिलेचे नाव दिपाली नितीन सोनवणे (वय २८, रा. निमखेडी, ता. जळगाव) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे (वय ३५) व दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह वास्तव्यास होत्या. नितीन सोनवणे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार केले. या हल्ल्यात दिपाली सोनवणे गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT