जळगाव

Jalgaon news | पोलीस 'सुस्त', जुगारी 'मस्त'! ५० मीटरवर चालला जुगार, पण आरोपी सटकले

वाघोडच्या मुंजोबा जत्रेत पोलिसांच्या देखत अवैध धंदे; 'आधीच पळाले' म्हणत निरीक्षकांनी झटकले हात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यातील वाघोड येथे भरलेल्या मुंजोबाच्या यात्रेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असताना, त्यांच्या डोळ्यादेखत 'सोरट' आणि 'गारुडी'सारखे अवैध जुगार जोरात सुरू होते.

मात्र, या जुगारांना जेरबंद करण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत राहिले आणि जेव्हा कारवाईची वेळ आली, तेव्हा आरोपी पोलिसांच्या हातून शिताफीने सटकले. अवघ्या ५० मीटरवर असलेले आरोपी पोलिसांना पकडता आले नाहीत, त्यामुळे आता पोलिसांच्या शारीरिक सुदृढतेवर आणि कार्यक्षमतेवर चर्चा सुरू झाली आहे. आरोपी निसटल्याचे प्रतिनिधीला अधिकाऱ्यांनी सागितले

श्रद्धेच्या ठिकाणी अवैध खेळांचा बाजार

वाघोड येथील मुंजोबा जत्रा ही जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी हजारो भाविक येत असतात. जत्रेत मुलांसाठी खेळणी, पाळणे आणि शेती उपयोगी साहित्याची मोठी दुकाने थाटलेली असतात. मात्र, या भक्तीमय वातावरणाला गालबोट लावत काहीनी मंदिराच्या अगदी जवळ अवैध व्यवसायांचा मांड मांडला होता. पैशांच्या जोरावर खेळले जाणारे हे अवैध खेळ राजरोसपणे सुरू होते.

५० मीटरचे अंतरही पोलिसांना पडले जड?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिथे हे अवैध व्यवसाय सुरू होते, तिथून अवघ्या ५० मीटरवर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बसलेले होते. आपल्या समोर काय चालले आहे, याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती. याबाबत रावेर पोलिस निरीक्षक विजय जयस्वाल यांना भ्रमणधणीवर माहिती देण्यात आली कारवाई करण्यास सांगतो असे म्हणाले मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी याबाबत विचारणा केली असता, "आम्ही कारवाई करायला गेलो, पण त्याआधीच आरोपी पळून गेले," असे अजब उत्तर दिले. ५० मीटरच्या अंतरावर असलेल्या आरोपींना पोलीस पकडू शकत नाहीत, यावरून पोलिसांच्या 'धावण्याच्या' आणि 'पकडण्याच्या' क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आरोपी सटकले की सटकवले?

पोलिसांच्या या उत्तरामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जर पोलीस तिथे उपस्थित होते, तर त्यांच्या डोळ्यादेखत हे व्यवसाय इतका वेळ सुरूच कसे राहिले? आणि जर कारवाई करायची होती, तर आरोपींना पळून जाण्याची संधी मिळालीच कशी? आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले की त्यांना जाणीवपूर्वक पळून जाण्याची संधी दिली गेली, असा संशय आता बळावला आहे.

खाकीची सुदृढता धोक्यात?

एकीकडे पोलिसांना फिट राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना, दुसरीकडे जत्रेसारख्या सार्वजनिक ठिकाणी ५० मीटर अंतरावरील आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज नसेल, तर सर्वसामान्यांचे संरक्षण कसे होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT