जळगाव : फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीतील देऊळगाव-कापूसवाडी रोडवरील ठांबरडा नाल्याजवळ २ जून २०२६ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून व्यापक तपास सुरू केला असून परिसरात सध्या शांतता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय पीडित महिला तिच्या परिचयातील रोषण गुलशेर तडवी यांच्यासोबत निर्जन जंगल परिसरात बसलेली असताना १५ जणांचा समूह तेथे आला. त्यांनी दोघांना धमकावून त्यापैकी युसूफ नामदार तडवी व अशपाक इमाम तडवी यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
या घटनेदरम्यान काही सहआरोपींनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर एका संशयित आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तपासावर स्वतः लक्ष ठेवले आहे.
फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १५ आरोपींपैकी १४ जणांना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.